राज्य निवडणूक आयोगाची स्पष्ट सूचना


मुंबई


राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराबाबत राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाची सूचना दिली आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार असून, त्यानंतर कोणत्याही प्रकारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने नोंदणीकृत व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत आयुक्त वाघमारे बोलत होते. प्रचाराची मुदत संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे, मुद्रित माध्यमे तसेच सोशल मीडिया व अन्य कोणत्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती, संदेश किंवा प्रचार साहित्य प्रसारित करणे पूर्णतः प्रतिबंधित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित नामनिर्देशनाबाबत सविस्तर माहिती आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सादरीकरणाद्वारे दिली. त्यांनी सांगितले की, इच्छूक उमेदवाराचे नाव संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत असणे अनिवार्य आहे. मात्र, सूचक (Proposer) आणि अनुमोदक (Seconder) यांचे नाव उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहे, त्याच प्रभागातील मतदार यादीत असणे आवश्यक आहे.

Election Commission Of Maharashtra


पक्षीय उमेदवार तसेच अपक्ष उमेदवार या दोघांनाही प्रत्येकी एक सूचक आणि एक अनुमोदक आवश्यक राहणार आहे. तसेच, उमेदवाराला एकापेक्षा जास्त प्रभागांतून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुभा असली, तरी एका प्रभागातील एका जागेसाठीच निवडणूक लढविता येणार आहे. याशिवाय, एका जागेसाठी जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील, अशी माहितीही काकाणी यांनी दिली.


राज्य निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि संबंधित यंत्रणांना निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


#राज्यनिवडणूकआयोग
#StateElectionCommission

यावर आपले मत नोंदवा

Trending