
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट – देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एकत्र येत माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. सुधर्शन रेड्डी यांची एकमताने उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी याची घोषणा करत ही लढाई ही केवळ निवडणुकीची नसून, एक वैचारिक लढाई असल्याचे स्पष्ट केले.
खरगे म्हणाले, “सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत ही लोकशाही आणि संविधानासाठी मोठी उपलब्धी आहे. संविधान जेव्हा जेव्हा धोक्यात येते, तेव्हा आम्ही सगळे मिळून त्याचे संरक्षण करण्यासाठी लढतो. या निवडणुकीत आम्ही असा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे, जो देशासाठी प्रामाणिकपणे काम करील.”
कोण आहेत बी. सुधर्शन रेड्डी?
श्री बी. सुधर्शन रेड्डी हे देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रगतीशील न्यायमूर्तींपैकी एक मानले जातात. त्यांचा न्यायव्यवस्थेतील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय अनुभव आहे – आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
त्यांचे निकाल आणि न्यायनिर्णय हे गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांच्या बाजूने ठाम उभे राहणारे आणि मूलभूत हक्कांचे रक्षण करणारे ठरले आहेत. त्यांचे कार्य सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायासाठीच्या लढ्यातील त्यांची बांधिलकी दाखवते.
संविधानाच्या मूल्यांवर होत आहे हल्ला – खरगे
“बी. सुधर्शन रेड्डी हे आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्यांचे प्रतीक आहेत. आज तीच मूल्यं संकटात आहेत. म्हणूनच आम्ही एकत्र येऊन हा लढा लढायचा निर्णय घेतला आहे,” असे खरगे यांनी ठामपणे सांगितले.
विरोधक 21 ऑगस्ट रोजी बी. सुधर्शन रेड्डी यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल करणार आहेत. हे निवडणूकच नव्हे, तर संविधान, लोकशाही आणि न्याय या मूल्यांवरचा लढा असल्याचा संदेश त्यांनी दिला.
उपाध्यक्षपदाची निवडणूक ठरवणार देशाचा वैचारिक प्रवास – विरोधकांची एकजूट ऐतिहासिक ठरणार का?


यावर आपले मत नोंदवा